महालक्ष्मी टाईम्सच्या बातमीची दखल

१५ दिवसांत महावितरणकडून गंजलेला विद्युत पोल बदलला

रात्बागिरी : सचिन पाटोळे 

दि .१५: संगमेश्वर तालुक्यातील आरवली, भोसलेवाडी येथील नागरिकांच्या जीवाला धोका ठरणाऱ्या गंजलेल्या विद्युत पोलच्या प्रश्नावर महालक्ष्मी टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची अखेर महावितरण विभागाने दखल घेतली आहे. बातमीच्या प्रभावामुळे अवघ्या १५ दिवसांत संबंधित ठिकाणी नवीन विद्युत पोल उभारण्यात आला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

भोसलेवाडी येथील घरानजीक असलेला विद्युत पोल पूर्णतः गंजलेला होता. कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या भागात सुमारे ६० ते ७० घरे असून ३०० ते ४०० लोकसंख्या वास्तव्यास आहे. वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

या संदर्भात गावकर राजेंद्र भोसले यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करत प्रश्न गांभीर्याने मांडला होता. तसेच विद्युत पोल तातडीने न बदलल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर महालक्ष्मी टाईम्स मध्ये सदर बाबीची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरण विभागाने तत्काळ हालचाल करत घटनास्थळी नवीन विद्युत पोल बसवला.

या कार्यवाहीमुळे भोसलेवाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून महालक्ष्मी टाईम्सच्या प्रभावी भूमिकेबद्दल व सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल आभार मानले आहेत. भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित तक्रारींवर महावितरणने वेळेत दखल घ्यावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.