रातांबी गावातील पत्रकार श्री. सचिन पाटोळे यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५”

रत्नागिरी : नियाझ खान 

दि.१४ : संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावचे सुपूत्र, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. सचिन पाटोळे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५” देऊन गौरविण्यात आले.पुणे येथील ढोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात बुधवार, दि. १० डिसेंबर २०२५ रोजी हा भव्य सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध अभिनेते मा. प्रसाद शिखरे तसेच सिने अभिनेत्री आयली घिया यांच्या शुभहस्ते श्री. सचिन पाटोळे यांना सन्मानपत्र व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

            गेली अनेक वर्षे श्री. सचिन पाटोळे हे समाजकार्य, पत्रकारिता व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण व निःस्वार्थ कार्य करत आहेत. ग्रामीण व सामाजिक प्रश्न, नागरिकांचे हक्क, जनहिताशी निगडित विषय यावर त्यांनी संवेदनशीलतेने व निर्भीडपणे मांडणी केली आहे. त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा, सचोटी व समाजाबद्दलची तळमळ अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

                             समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे श्री. पाटोळे यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आल्याने रातांबी गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून या सन्मानामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.