मुंबई: प्रतिनिधी
दि. ७: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची आज जपानमधील सागा प्रांताचे गव्हर्नर व उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट घेऊन पर्यावरण, प्लास्टिक मुक्ती, शिक्षण आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.नदी पुनरुज्जीवन आणि प्लास्टिकमुक्त जलस्रोत हा राज्याचा प्राधान्यक्रम असून यासाठी जपानचे सहकार्य मोलाचे ठरेल असा विश्वास पर्यावरण व दुग्धविकास मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
समुद्रातील व नदीतील प्रदूषण रोखणे, प्लास्टिक कचऱ्याविरुद्ध संयुक्त प्रयत्न करणे तसेच शिक्षण, पशुसंवर्धन आणि सौंदर्यप्रसाधन उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबतही यावेळी महाराष्ट्र आणि जपानच्या शिष्टमंडळात सकारात्मक चर्चा झाली.पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या ‘रामटेक’ या शासकीय निवास्थानी झालेल्या या बैठकीला जपानच्या सागा प्रांताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सागा प्रांताचे गव्हर्नर योशिनोरी यामागुची यांनी केले. त्यांच्यासमवेत प्रादेशिक देवाणघेवाण विभागाचे उपमहासंचालक मसाहिरो ओनो, आंतरराष्ट्रीय धोरण गटाचे उपसंचालक कोजी योशिताके, प्रकल्प प्रमुख कोकी कनामारू आणि जेट्रो सागाचे मुख्य संचालक हिरोशी योनेयामा उपस्थित होते.तर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव देवेंद्र सिंह आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, समुद्रातून वाहून येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर नद्यांमधील प्रदूषण हीदेखील चिंतेची बाब असून, भारतीय संस्कृतीत नद्यांचे पवित्र स्थान लक्षात घेता त्यांच्या स्वच्छतेसाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम हाती घेणार आहे, असे मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.यावेळी राज्यपाल यामागुची यांनी जपानकडील तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापन अनुभव आणि संशोधन क्षमता महाराष्ट्रासोबत सामायिक करण्याची तयारी दर्शवली. आशियाई समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी “ज्ञान भागीदारी”च्या माध्यमातून संयुक्त उपक्रम राबविण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिकेवर यावेळी चर्चा झाली.