यड्राव: राम आवाळे
दि.६: विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी तसेच आई-वडिलांची मान उंचावण्यासाठी आपल्या गुणवत्तेतील वेगळेपण ठळकपणे दाखवले पाहिजे. स्पष्ट ध्येय ठेवून काळानुसार बदल स्वीकारले नाहीत, तर अपयश अटळ आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.
ते येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते.
गणेश शिंदे म्हणाले, संत गाडगेबाबा कर्मप्रधान जीवनाचा संदेश देत असत. त्याच विचारांची प्रचीती बागणे यांच्या कार्यातून दिसते. गरीब व कष्टकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे आयुष्य घडविण्याचे पवित्र कार्य संस्था करत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून गुणवत्तापूर्ण ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवून समाजाभिमुख शिक्षण घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात अनिल बागणे म्हणाले, शरद इन्स्टिट्यूट ही केवळ शिक्षणसंस्था नसून उद्योग, कौशल्य व संस्कारांचे मंदिर आहे. विद्यार्थ्यांना समाजातील संघर्षांना सामोरे जाण्याची ताकद देणारा ‘शरद पॅटर्न’ घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असून शेवटच्या विद्यार्थ्याच्या हाताला रोजगार मिळेपर्यंत प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एस. ताशिलदार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून श्रद्धा सुतार, उत्कृष्ट वसतिगृह विद्यार्थी म्हणून पार्थ पारिख तसेच विद्यार्थीनी प्राची पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान दोन दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनात पारंपरिक दिन, रेकॉर्ड व पेपर फिशपॉन्ड, फॅशन शो, रांगोळी, मेहंदी, पाककला, सॅलड डेकोरेशन तसेच क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन व टेबल टेनिस आदी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. पी.एस. चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. दिपाली पाटील, प्रा. अंकिता धड्डे, एलआर श्रद्धा सुतार, जीएस धर्मराज उपाध्ये यांच्यासह सर्व डीन, विभागप्रमुख, क्रीडा विभागाचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुजा जुगळे व प्रा. धनश्री लोहार यांनी केले, तर आभार श्रद्धा सुतार हिने मानले.