विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे काटेकोर नियोजन करावे: प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर

सांगली: अय्यान पटेल

दि.११:विटा येथे शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या विधी सेवा व  शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे काटेकोर नियोजन करून, हा महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष व्ही. डी. निंबाळकर यांनी केले.

            जिल्हा व सत्र न्यायालय सांगली येथील बैठक सभागृहात आयोजित महामेळाव्याचे नियोजन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव गि. ग. कांबळे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

            महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून, न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे व न्यायमूर्ती सोमसेखर सुंदरेसन न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई व पालक न्यायमूर्ती, सांगली यांच्याहस्ते उ‌द्घाटन होणार आहे. त्यामुळे या महामेळाव्याच्या आयोजनात कोणतीही त्रृटी राहणार नाही, याची दक्षता संबंधित सर्व यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष व्ही. डी. निंबाळकर यांनी दिल्या.

            हा महामेळावा शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जय मातादी मंगल कार्यालय, विटा येथे होणार आहे. या दिवशी विविध शासकीय कार्यालयाचे एकूण 40 स्टॉल मांडण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालयाचे अधिकारी/प्रतिनिधी प्रत्येक स्टॉलवर आपल्या विभागाची माहिती देणार आहेत. तसेच काही लाभार्थींना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तरी सांगली जिल्ह्यातील व विटा परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष व्ही. डी. निंबाळकर यांनी यावेळी केले.

          जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष व्ही. डी. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे.