इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१९: फेब्रुवारी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिका च्या वतीने विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहरातील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास, के. एल. मलाबादे चौक येथील राज्याभिषेक सोहळा फलकास, शंभुतीर्थ येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी उद्यानातील अर्धपुतळ्यास महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे व उपायुक्त विद्या कदम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.याचबरोबर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यगीत म्हणून अंगीकारलेले गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत वाजविण्यात आले. यामुळे कार्यक्रमात देशभक्तीचा व अभिमानाचा उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला.
तसेच महानगरपालिका बालवाडी विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे ‘शिव जन्मोत्सव’ सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास नगरसेवक, माजी नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या आदर्शांचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.