इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१० : इचलकरंजी महानगरपालिकेचे सन २०२६–२०२७ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्याकडे सोमवारी (दि.९ मार्च) सादर केले.इचलकरंजी नगरपरिषदेचे जून २०२२ मध्ये महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर मागील तीन वर्षे प्रशासनाकडून वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यात येत होते. मात्र यंदा जानेवारी महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडून लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आले आहे. सोमवारी (दि.९ मार्च) स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या लेखा विभागाकडून तयार करण्यात आलेले सन २०२६–२०२७ या वर्षाचे वार्षिक अंदाजपत्रक तसेच सन २०२५–२०२६ या वर्षाचे दुरुस्त अंदाजपत्रक आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्याकडे सादर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहायक लेखाधिकारी रामचंद्र कांबळे व चंद्रकांत लोखंडे उपस्थित होते.
दरम्यान, या अंदाजपत्रकावर विचारविनिमय करण्यासाठी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी गुरुवार, दि.१२ मार्च रोजी स्थायी समितीची बैठक बोलावली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हे अंदाजपत्रक पुढील मंजुरीसाठी महासभेकडे पाठविण्यात येणार आहे.