सांगली: अय्यान पटेल
दि.१६: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत प्रकरणांवर संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, नागरी हक्क संरक्षण पथकाच्या एस. व्ही. वागलगावे आदी प्रत्यक्ष तर दूरदृष्यप्रणालीद्वारे उपविभागीय दंडाधिकारी व पोलीस अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे व सद्यस्थिती, जातीच्या दाखल्याची प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी, अत्याचार पीडितांना नुकसान भरपाई, गंभीर गुन्ह्यांतील पीडितांच्या वारसांचे पुनर्वसन आदिंचा आढावा घेतला. जातीच्या दाखल्या अभावी प्रलंबित प्रकरणे तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करून निकाली काढावीत, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी ज्येष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण व हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसनाबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत विविध प्रकरणांचा आढावा घेऊन संबधितांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी बाळासाहेब कामत यांनी प्रलंबित प्रकरणे, मागील इतिवृत्त, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे आदिंबाबत सविस्तर आढावा समितीसमोर दिला.