इचलकरंजीत सुत भेसळ प्रकरण गांभीर्याने केंद्राच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक, कठोर कारवाईचा इशारा

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.७: शहरात विक्री होत असलेल्या सुतामध्ये भेसळ होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर यंत्रमाग उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यार्न मर्चंट असोसिएशनकडे तक्रार करूनही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने थेट केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्तांकडे धाव घेतली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वस्त्रोद्योग प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी इचलकरंजीत येऊन विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

     केंद्रीय वस्त्रोद्योग प्रादेशिक कार्यालयाचे डायरेक्टर व ऑफिस इनचार्ज सतीश कुमार सिंग, सहाय्यक संचालक विकास गुप्ता, तांत्रिक अधिकारी योगेश पोवार व सहाय्यक राजू नायर यांनी प्रथम यार्न मर्चंट असोसिएशनबरोबर बैठक घेतली. त्यानंतर दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन, अडत व्यापारी, ट्रेडिंग असोसिएशन आणि फॅब्रिक क्लॉथ ब्रोकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुत भेसळीच्या प्रकाराची सविस्तर माहिती देताना सांगितले की, काही व्यापारी सुतामध्ये पॉलिस्टर, विस्कोस, लॉयॉझील व नायलॉन धाग्यांचे मिश्रण करून ते १०० टक्के कॉटन सुत म्हणून विक्री करत आहेत. विशेषतः ४० काउंटच्या सुतामध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी विस्कोस व पॉलिस्टर मिसळून ते ६० काउंट म्हणून बाजारात आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला.या भेसळीमुळे तयार होणाऱ्या कापडाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून प्रोसेसिंगनंतर पट्टे पडण्यासारखे दोष दिसून येत आहेत. परिणामी यंत्रमागधारक आणि व्यापारी यांच्यात वाद वाढत आहेत. काही अडत व्यापाऱ्यांनी तर इचलकरंजीतील कापड खरेदी बंद करण्याचा इशाराही दिला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

     लहान यंत्रमागधारकांचे क्लेम मान्य न करणे, उलट सुत पुरवठा बंद करण्याची धमकी देणे, तसेच काही व्यापारी स्वतःच्या स्पिनिंग मिलमधून हवे तसे सुत तयार करून दलालांच्या माध्यमातून विक्री करत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.यावेळी पॉवरलुम असोसिएशनकडून काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये सुत विक्री करताना गेटपास व बिलावर सुतातील मिश्रणाची अचूक माहिती देणे बंधनकारक करावे, क्लेम आल्यास व्यापाऱ्यांनी पूर्ण जबाबदारी घ्यावी आणि भेसळयुक्त सुत विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्यांचा समावेश होता.चर्चेनंतर सतीश कुमार सिंग यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच पुढील काळात सुतामधील मिश्रण व काउंटची अचूक माहिती देणे व्यापाऱ्यांना बंधनकारक केले जाईल, असे आश्वासन दिले.या बैठकीस पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, क्लॉथ असोसिएशनचे अध्यक्ष रामपाल भंडारी, अडत असोसिएशनचे संपतजी संकलेचा, फॅब्रिक ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.