शेंबवणे प्रीमियर लीग पर्व चौथे : क्रिकेटचा जल्लोष रंगणार, गाव एकवटले!

संगमेश्वर: सचिन पाटोळे 

दि. २६एप्रिल २०२६ :रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य शेंबवणे गाव पुन्हा एकदा क्रिकेटच्या उत्साहाने दुमदुमणार आहे. “शेंबवणे प्रीमियर लीग पर्व चौथे” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ग्रामस्थांच्या एकजुटीतून करण्यात आले आहे.मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या २ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या जुवळेवाडी मैदानावर ही दोन दिवसीय स्पर्धा शनिवार, दि. २ मे आणि रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी रंगणार आहे. ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने तसेच गाव प्रमुख, वाडी प्रमुख, मानकरी, सरपंच, पोलीस पाटील, स्पर्धेचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई मंडळाच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मागील तीन वर्षांप्रमाणे यंदाही ही स्पर्धा अधिक जोशात आणि शिस्तबद्ध नियोजनासह पार पडणार असून संपूर्ण गाव या तयारीत सहभागी झाले आहे. ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून गावातील तरुणांना एकत्र आणून त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ देणारा एक सामाजिक उपक्रम ठरत आहे. यासोबतच गावाच्या विकासकामांना चालना देण्याचा उद्देशही या माध्यमातून साध्य होत आहे.
विशेष म्हणजे, मैदानाची तयारी, विकेट बनवणे, व्यवस्थापन आणि पाहुणचारापर्यंत सर्व कामांमध्ये ग्रामस्थ स्वतःहून पुढाकार घेत आहेत. स्पर्धेदरम्यान उपस्थित क्रीडाप्रेमींसाठी दोन दिवस उत्तम भोजन व्यवस्था करण्यात आली असून एका दिवशी शाकाहारी तर दुसऱ्या दिवशी मांसाहारी जेवणाचा आस्वाद मिळणार आहे.
शेतकरी, व्यावसायिक, मिस्त्री, रिक्षाचालक अशा विविध क्षेत्रातील नागरिक आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून ३ ते ४ दिवस या स्पर्धेसाठी तन-मन-धनाने योगदान देत आहेत. तसेच अनेक दानशूर व्यक्तींकडून रोख रक्कम, चषक, औषधे आणि अन्नधान्याच्या स्वरूपात मदत मिळत असल्याने स्पर्धेला भक्कम पाठबळ मिळत आहे.
यंदाचे “शेंबवणे प्रीमियर लीग पर्व चौथे” अधिक भव्य आणि आकर्षक होणार असल्याने संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गावाच्या एकजुटीचे आणि समृद्ध क्रीडा संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या स्पर्धेला उपस्थित राहून तिची शोभा वाढवावी, असे आवाहन शेंबवणे ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांनी केले आहे.