राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक ; मतदारांना देवाची धमकी देत आचारसंहितेचा भंग

संगमेश्वर – प्रतिनिधी 

दि.२७ :तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येथील निवडणूक प्रचार संपला असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीतील प्रभाग क्र. १ च्या उमेदवार शमिका पाटोळे यांचे पती सचिन रमेश पाटोळे यांच्याविरोधात निवडणूक विभागाकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार देण्यात आली आहे. राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक सरपंच पदाचे उमेदवार राजेश शिर्के यांनी २५ एप्रिल २०२६ रोजी लेखी संगमेश्वर तक्रार तालुका निवडणूक अधिकारी आणि संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती.

राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा प्रचार थांबला आहे. सचिन पाटोळे यांनी त्यांच्या गावच्या व्हॅाटसॲप ग्रुपवर पुणे चाकरमानी यांना मेसेज करत सर्वांनी सचिन रमेश पाटोळे यांनी सांगितलेल्या गाडीतूनच यावे अन्यथा गावच्या देवाची आणि गावाची जबाबदारी आम्ही घेणार नसल्याचे सांगत थेट देवाची भीती दाखवून आचारसंहितेचा भंग करत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार सरपंच पदाचे उमेदवार राजेश शिर्के यांनी केली होती.

सरपंचपदाचे उमेदवार राजेश शिर्के यांच्या तक्रारीनंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी रातांबी गावात घटनास्थळी भेट देवून सद्यस्थिती जाणून घेतली असून आचारसंहिता भंग करण्याचे कोणतेही प्रकार होवू नयेत अशी समज पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी सचिन पाटोळे व त्यांच्या सहका-यांना यावेळी दिली. राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत सर्वांनी कायद्याचे पालन करुन मतदान शांततेत पार पाडण्याची सूचना यावेळी पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी केली.