कडवई :दीपक तुळसणकर
दि २८ एप्रिल २०२६: आज रोजी सेवा हक्क दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत कडवई येथे लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभपणे मिळाव्यात यासाठी “आदर्श आपले सरकार सेवा केंद्र” स्थापन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत अधिकारी श्री. राहुलकुमार चौधरी यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, नागरिकांना शासनाच्या विविध सेवा पारदर्शक, सुलभ आणि विहित वेळेत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याच्या सूचना शासन स्तरावरून प्राप्त झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय श्री. संतोषजी थेराडे यांच्या हस्ते कडवई ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात सेवा हक्क दिनानिमित्त या सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सेवा केंद्रामार्फत विवाह नोंदणी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, असेसमेंट प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र तसेच मृत्यू प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य श्री. दत्तारामजी लाखन, कडवई ग्रुप ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. दत्तारामजी ओकटे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.