खेड: सचिन पाटोळे
दि.२८: “विज्ञानाच्या युगात आपण आधुनिक साधनसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असलो, तरी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यात समाज अजूनही मागे असल्याचे वास्तव आहे. यामुळेच अंधश्रद्धा समाजात घट्टपणे रुजून राहिल्या आहेत. आपल्या श्रद्धा आंधळेपणाने न मानता त्या वैज्ञानिक कसोटीवर तपासल्या पाहिजेत,” असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रत्नागिरीचे राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर यांनी केले.
खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्र. ८९, भेलसई बौद्धजन मंडळ मुंबई (नोंदणीकृत), मायावती महिला मंडळ तसेच पंचशील तरुण मंडळ, भेलसई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती व प्रशिक बुद्धविहाराचा ५० वा वर्धापन दिनानिमित्त दि. २५ व २६ एप्रिल २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बौद्धजन मंडळ मुंबईचे अध्यक्ष सुनील तांबे,शाखा अध्यक्ष बळवंत तांबे, अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव संदीप गोवळकर यांच्यासह स्थानिक परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंनिसचे सचिन गोवळकर म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचार करण्याची शिकवण आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अंधश्रद्धेमुळे समाजाची प्रगती खुंटते. त्यामुळे प्रत्येकाने प्रश्न विचारण्याची आणि सत्य शोधण्याची वृत्ती जोपासली पाहिजे.”या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे रत्नागिरी जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संदीप गोवळकर यांनी सादर केलेली विज्ञानाची प्रात्यक्षिके. त्यांनी ‘पाण्याने दिवा पेटवणे’ आणि ‘पाण्याने आग लावणे’ यांसारखे तथाकथित चमत्कार करून दाखवले आणि त्यामागील लपलेले विज्ञान अत्यंत सोप्या भाषेत उपस्थितांना समजून सांगितले. ढोंगी बाबांकडून समाजाची कशी फसवणूक केली जाते, हे या प्रयोगातून स्पष्ट करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष तांबे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच, युवकांनी सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात सांस्कृतिक उपक्रमांद्वारे प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल तांबे व आभार प्रदर्शन निलेश तांबे यांनी केले.