इचलकरंजीत संतापाची लाट : नसरापूर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने, आरोपीस फाशीची मागणी

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.४: साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या नसरापूर (ता. भोर) येथील घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून इचलकरंजीतही संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ सकल ब्राह्मण समाज, इचलकरंजी यांच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

      या वेळी आंदोलकांनी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कायदे करण्यात यावेत, अशी ठाम मागणी केली. निदर्शनानंतर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले की, नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत क्रूर, अमानुष व संतापजनक असून एका निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

     आरोपीला अटक झाली असली तरी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. महिलां व लहान बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलीस प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना कराव्यात, तसेच शासनानेही कायदे अधिक कठोर करून पोलिसांचे हात बळकट करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनात सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी व समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.