इचलकरंजीत जनगणना २०२७ साठी ४९६ ब्लॉकची निर्मिती; प्रगणक-पर्यवेक्षकांना प्रशिक्षण पूर्ण

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि .४ : आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरासाठी एकूण ४९६ ब्लॉक तयार करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कामासाठी महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५११ प्रगणक आणि ८७ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कामकाजासाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना तीन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये २७ ते २९ एप्रिल, २ मे ते ४ मे आणि ६ मे ते ८ मे २०२६ या कालावधीत प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली. हे प्रशिक्षण डी.के.ए.एस.सी. महाविद्यालय, श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, डी.के.टी.ई. इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि बालाजी हायस्कूल येथे १० फील्ड ट्रेनर्समार्फत देण्यात आले.

            प्रशिक्षणादरम्यान स्लाईडशोच्या माध्यमातून जनगणना प्रक्रियेची माहिती देण्यात आली. तसेच शेवटच्या दिवशी प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष परिसरात जाऊन घरभेटी देत कामकाजाचे प्रात्यक्षिकही घेतले. यावेळी उपायुक्त व शहर जनगणना अधिकारी नंदू परळकर, सहायक आयुक्त रोशनी गोडे, अतिरीक्त चार्ज अधिकारी रामचंद्र कांबळे, शीतल पाटील, गणेश शिंदे, नितीन बनगे, विजय राजापुरे, समन्वयक गौस जमादार, राहुल पांढरपट्टे, दिलीप पारसे यांच्यासह तांत्रिक सहाय्यक शंतनु सोनवणे, सत्यजित पाटील, साहिल चोपडे, अर्जुन लोले आदी उपस्थित होते.

          दरम्यान, जनगणना २०२७ अंतर्गत नागरिकांसाठी दि. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वयंगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरून स्वयंगणना करण्याचे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.