लांजा येथील काजू फॅक्टरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत, ९.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लांजा:प्रतिनिधी 

दि.६:लांजा तालुक्यातील कोवळवाडी येथील काजू फॅक्टरीमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ९ लाख ४१ हजार ८७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते २९ मे रोजी सकाळी ९.२० या कालावधीत कोवळवाडी येथील एका काजू फॅक्टरीचे कुलूप तोडून काजूगर चोरीस नेण्यात आला होता. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत शाहरुख मुराद साखरकर (वय ३०, रा. भाट्ये, रत्नागिरी) आणि वजीद मोहम्मद अर्शीद खान (वय ४१, मूळ रा. बांद्रा पश्चिम, मुंबई; सध्या रा. भाट्ये, रत्नागिरी) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीस गेलेला माल तसेच गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण ९.४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन देरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, सहाय्यक फौजदार सुभाष भागणे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, अमित कदम, दिपराज पाटील तसेच चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला.