सायबर पोलिसांची मोठी कारवाई; १.२३ कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील आरोपी दिल्लीतून जेरबंद

रत्नागिरी :नियाझ खान 

दि.६: स्वतःला बेंगळुरू पोलीस, सीबीआय अधिकारी तसेच नवी दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) येथील खात्यामधून ३ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची भीती दाखवली. तसेच त्यांना “डिजिटल अरेस्ट” करण्यात आल्याचे सांगून चौकशीच्या नावाखाली वारंवार पैशांची मागणी केली. दि. ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादीकडून विविध टप्प्यांमध्ये एकूण १ कोटी २३ लाख रुपये उकळण्यात आले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा क्रमांक ०२/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. त्यातून दिल्ली-नोएडा येथील गगनदीप भारद्वाज याचा सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांनी केली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलीस, सीबीआय किंवा इतर सरकारी यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगून बँक खाते, सिमकार्ड किंवा आर्थिक व्यवहारांबाबत चौकशीच्या नावाखाली वैयक्तिक माहिती किंवा पैसे मागितले जात असतील, तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नये. कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नये आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.