संगमेश्वर: सचिन पाटोळे
दि .१२ : – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावातील शेतकऱ्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट व निकृष्ट नियोजनामुळे मोठा फटका बसत आहे. महामार्गालगत असलेल्या भोसले कुटुंबाच्या भातशेतीत रस्त्यावरील माती, दगड-राडा आणि गाळ पावसाच्या पाण्यासोबत वाहून येत असल्याने सलग दुसऱ्या वर्षी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महामार्गाचे काम करताना संबंधित यंत्रणेकडून आवश्यक पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार किंवा जलवाहिनीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाळ्यात महामार्गावरील सर्व माती, दगड आणि बांधकामातील अवशेष थेट शेतजमिनीत जमा होत आहेत. त्यामुळे शेतजमिनीची सुपीकता कमी झाली असून यावर्षी भात लागवड करणेही अशक्य झाले आहे.
विशेष म्हणजे, याच कारणामुळे गेल्या वर्षी देखील भोसले कुटुंबाच्या शेतीचे नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासन व महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन परिस्थिती दाखवून दिली होती. नुकसान मान्य करत प्रशासनाने शेतकऱ्याला भरपाई दिली होती तसेच पुढील वर्षी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, एक वर्ष उलटूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने यावर्षी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, प्रशासन आणि महामार्ग कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असून शेती करण्याचा हक्कही हिरावला जात आहे.भोसले कुटुंबाने याप्रकरणी तात्काळ स्थळ पाहणी करून पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी गटार व्यवस्था उभारावी, झालेल्या नुकसानीची पंचनाम्यासह भरपाई द्यावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे की, मागील वर्षी नुकसान भरपाई देऊनही प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नसल्याने शेतकऱ्यांना वारंवार नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.