संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि.१२: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेरशेत गावाजवळील हॉटेल विसावा परिसरात महामार्गाच्या अर्धवट व सदोष कामामुळे गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिनेश दाजी परकर यांनी दिला आहे.पावसाळ्यात या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी वारंवार अपघात घडत असून अनेकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महामार्गालगत आवश्यक असलेली गटार व पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आरवली येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश दाजी परकर गेल्या तीन वर्षांपासून या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
विशेष म्हणजे, प्रशासनाने आपली जबाबदारी पार न पाडल्याने दिनेश परकर यांनी स्वतःच्या खर्चाने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावर साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून केले आहे. शासन यंत्रणेची जबाबदारी एका सामाजिक कार्यकर्त्याला पार पाडावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी तातडीने गटार व्यवस्था उभारून पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या अपघातांची व संभाव्य जीवितहानीची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि संबंधित ठेकेदारावर राहील, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केल्यास आरवली गावातील सहकाऱ्यांसह लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा दिनेश दाजी परकर यांनी दिला आहे. तसेच नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.