मणेरे शैक्षणिक संकुलात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.१६ : श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता परिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून ‘नवागतांचे स्वागत’ करण्यात आले. विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात, प्रवेशद्वारासमोर आकर्षक फुगे, रांगोळी आणि फुलांच्या वर्षावात करण्यात आले. यावेळी मुलांचे औक्षण करून त्यांना बिस्किटे व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेऊन “पहिले पाऊल” हा उपक्रम राबविण्यात आला. हे ठसे पालक व शाळेच्या स्मरणार्थ संग्रहित ठेवण्यात आले. तसेच वर्गखोल्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आनंदाने छायाचित्रे काढली.यावेळी शालेय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये गोड शिरा व मसाले भात देण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव अनिलकुमार मणेरे, अध्यक्ष शितलकुमार मणेरे, उपाध्यक्ष सुभाष केटकाळे, मार्गदर्शक अशोक वसगडे, मणेरे हायस्कूलच्या प्राचार्या वैशाली मंगसुळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा ऐनापूरे, बालवाडी विभागप्रमुख स्वाती ढेकळे, कॉलेज विभागप्रमुख दिपाली चौगुले, कुसुम ऑलिम्पियाड विभागप्रमुख शैलेश कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह फुलविणारा हा स्वागत समारंभ संस्मरणीय ठरला.