सांगली: अय्यान पटेल
दि.२४: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार आज दि. 24 जून रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्यावतीने वीर परिवार विधी सेवा चिकित्सा कक्ष सैनिकी बोर्ड, सांगली येथे सकाळी १० वाजता कायदेविषयक जनजागृतीपर शिबीर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.
या शिबीर प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी वीर परिवार सैनिक बोर्ड योजना याबाबत माहिती सांगितली. त्यात प्रामुख्याने देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या तसेच सेवेदरम्यान वीरमरण प्राप्त झालेल्या सैनिकांच्या आश्रितांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच कोणत्याही सैनिकांना कायदेविषयक काही मदतीची आवश्यकता असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली तर्फे नियमांप्रमाणे सर्वोतोपरी मदत केल्या जातील, अशी हमी त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग.कांबळे यांनी वीर परिवारांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. संबंधित विधी योजनांसाठी अर्ज करताना आवश्यक असलेली कागदपत्रे, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया याबाबत महिती दिली. ७ ऑगस्ट २०२५ रोजी वीर परिवार योजना कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांनी या योजनेअंतर्गत एकूण ४८ सैनिकांना विधी सल्ला दिला आहे. त्यामध्ये एकूण १० सैनिकांना मोफत वकिल देण्यात आले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत सल्ला, विधी सेवा तसेच हेल्पलाइन नंबर १५१०० यावरती संपर्क करावा. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कर्नल वसंतराव शिंदे (निवृत्त) व विंग कमांडर प्रकाश नवले (निवृत्त) यांनी मनोगत व्यक्त केले. कर्नल वसंतराव शिंदे (निवृत्त) यांनी स्वागत केले. कल्याण संघटक अजयकुमार चव्हाण यांनी ओळख करून दिली. गजानन जाधव यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सर्व नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, अधिक्षक शंकरराव वानखेडे, सहाय्यक कर्मचारी संतोष खंदारे, नितिन आंबेकर यांनी केले. कार्यकमास माजी सैनिक व सैनिकी वसतिगृहातील मुले व मुली, सैनिक संकुलचे कर्मचारी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.