रुहानी फाउंडेशन व नोबेल हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी : हबीब शेख्दर्जी
दि.२६: येथील रुहानी ग्रुप फाउंडेशन आणि नोबेल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोहरम तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. घोडकेनगर येथील रुहानी मस्जिद परिसरात पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, १५० हून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मूत्रविकार, हाडांचे आजार आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली. आवश्यक रुग्णांना पुढील उपचार, शस्त्रक्रिया तसेच औषधोपचाराबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन नगरसेवक चंद्रकांत शेळके, रुहानी मस्जिदचे अध्यक्ष हाजी रसूल खलीफा आणि नोबेल हॉस्पिटलचे डॉ. रहिम खान यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना नगरसेवक शेळके यांनी, “हा उपक्रम कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित न ठेवता सर्वांसाठी आयोजित करण्यात आला, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. जाती-पातीच्या भिंती बाजूला ठेवून समाजहिताचे असे उपक्रम राबविण्याची आज नितांत गरज आहे,” असे मत व्यक्त केले.

शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय रसाळ, डॉ. रहिम खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी आयुब गजबरवाडी, डॉ. हबीब पटेल, मिरासाहेब सय्यद, हाजी मुबारक मुल्ला, नुरुद्दीन सनदी, मुफ्ती फिरोज चांदकोटी, सुरज एकसंबेकर, फैयाज एकसंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुहानी मस्जिदचे पदाधिकारी, रुहानी ग्रुप फाउंडेशनचे सदस्य तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.