महापौरांकडून विकासकामांची पाहणी; रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि ७ जुलै २०२६ : शहरातील आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या मार्गावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करत महापौरांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः भुयारी गटार योजना, सिमेंट काँक्रीट रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे मुदतीत पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे निर्देश देण्यात आले.

           पाहणीदरम्यान गावभाग पोलीस स्टेशन परिसरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाची माहिती घेऊन संबंधित ठेकेदार मौला बागवान यांना काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच या ठिकाणापासून महासत्ता चौकापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता उभारणाऱ्या ठेकेदार कोकरेजा यांना रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करून तो लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्याचे निर्देश देण्यात आले.

         निरामय हॉस्पिटल परिसरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाचीही महापौरांनी पाहणी केली. एलसी इन्फ्रा कंपनीच्या प्रतिनिधींना निरामय हॉस्पिटल ते हॉकी स्टेडियमदरम्यान खोदलेला रस्ता तातडीने बुजवून वाहतुकीस सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

          महासत्ता चौकातील नायकवडे हॉस्पिटल परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्याबाबत ठेकेदार पाटणी यांना आदेश देण्यात आले. तसेच पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या एका उघड्या विहिरीभोवती सुरक्षेसाठी कठडे उभारण्याचे निर्देशही देण्यात आले.

          उपरोक्त सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावीत, यासाठी शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर व बाजीराव कांबळे यांनाही आवश्यक सूचना करण्यात आल्या.या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेविका सौ. ध्रुवती दळवाई, नगरसेवक नवनाळे, रुबन आवळे, पत्रकार तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.