रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मनपा आयुक्तांच्या हस्ते गौरव

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.७ जुलै २०२६ : येथील रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ मध्ये इयत्ता पाचवी व आठवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीतील अनुज कनोजे याने राज्य गुणवत्ता यादीत १७ वा क्रमांक पटकावत शाळेच्या नावलौकिकात भर घातली. तसेच इयत्ता पाचवीतील समर्थ चुंबळकर, आरुष खोत, प्रतिक व्हनुगरे आणि इयत्ता आठवीतील अनविका जाधव, राजवर्धन पोवार, यश पुजारी व रोहिणी देवरेड्डी या जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

          यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षा हा भविष्यातील विविध शासकीय स्पर्धा परीक्षांचा भक्कम पाया असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने अभ्यास करण्याचे आवाहन केले. तसेच चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेमार्फत आवश्यक मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

             प्रशासनाधिकारी इरफान पटेल यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. दीपक रावळ, अजित (मामा) जाधव आणि शिक्षण सभापती विद्या साळुंखे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शिक्षण उपसभापती पूनम माळी, नगरसेविका सुरेखा जाधव, नगरसेवक नितेश पोवार, नगरसेविका स्नेहल रावळ, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका डॉ. अलका शेलार यांनी केले. सूत्रसंचालन गतारे मॅडम यांनी, तर आभार धुपदाळे मॅडम यांनी मानले.