दीड लाखांचा सौदा; अखेर लाखात डील! पोलीस हेड कॉन्स्टेबलसह तिघे एसीबीच्या जाळ्यात;

साहेबांसाठी’ पैसे घेणारा खासगी इसमही रंगेहाथ
  • कोल्हापूर :प्रवीण भोसले
  • दि. 8 :अर्जाच्या चौकशीत मदत करतो, नाहीतर गुन्हा दाखल करतो…” अशी भीती दाखवत दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचा सौदा अखेर एक लाख रुपयांत ठरला. मात्र, लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने टाकलेल्या सापळ्यात पोलीस कर्मचाऱ्यासह दोन खासगी इसम अडकले. या धडाकेबाज कारवाईने कुरुंदवाड पोलीस ठाण्यासह पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
    या प्रकरणातील तक्रारदार हे ५७ वर्षीय बेकरी व्यावसायिक आहेत. त्यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल झाला होता. या अर्जाची चौकशी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष विश्वास साळुंखे (वय ४३) यांच्याकडे होती.
    अर्जाच्या चौकशीच्या नावाखाली साळुंखे यांनी तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. “अर्जाच्या चौकशीत मदत करायची असेल तर दीड लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करतो,” अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
    तक्रारदाराने पैशांची जुळवाजुळव झाल्यानंतर भेटतो, असे सांगितले. त्यानंतर साळुंखे यांचा ओळखीचा फिरोज पापालाल विजापूरे (वय ४०, रा. हेरवाड, ता. शिरोळ) हा तक्रारदाराला भेटला. “साहेबांनी सांगितलेले दीड लाख रुपये कमी घेणार का?” असा थेट सवाल करीत त्याने लाचेच्या रकमेबाबत सौदा करण्याचा प्रयत्न केला.
    तक्रारदाराने किती कमी करायचे, अशी विचारणा केल्यानंतर विजापूरे याने साळुंखे यांच्याशी बोलून काहीतरी कमी करूया, असे सांगितले. दरम्यान, या संपूर्ण लाचेच्या व्यवहाराची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर यांना दिली.
    तक्रारीची पडताळणी करताना एसीबीसमोर या प्रकरणातील लाचेच्या व्यवहाराचा पर्दाफाश झाला. तडजोडीनंतर एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचे निश्चित झाले. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. जमीर सलीम पठाण (वय ४१, रा. कुंभोजवाड, ता. शिरोळ) यानेही तक्रारदाराला पोलीस साळुंखे यांना पैसे दे, असे सांगून लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
    त्यानंतर एसीबीने सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष साळुंखे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचेच्या मागणीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने फिरोज विजापूरे आणि जमीर पठाण यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
    पोलीस कर्मचाऱ्याने लाचेची मागणी करणे, खासगी इसमामार्फत लाचेचा सौदा करणे आणि अखेर एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकणे, या प्रकारामुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
    या प्रकरणी तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक वैभवी पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पोलीस उपायुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेसपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी पथकाने ही कारवाई केली.