इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि. १० : कबनूर-कोल्हापूर रोडवरील गोळीबार प्रकरणाचा तपास करताना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आणखी दोघांना अटक केली. पिस्तुलाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेला शुभम दीपक सूर्यवंशी (वय २५, रा. साईनगर, कबनूर) याच्याकडून एक पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे असा एकूण ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शुभमने हे पिस्तुल ज्याच्याकडून खरेदी केले, त्या जॅकी माळगे (रा. फुलेनगर, कबनूर) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.कबनूर-कोल्हापूर रोड येथे झालेल्या गोळीबारात निलेश कांबळे हा गंभीर जखमी झाला होता. मित्रांनी त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याच्या डोक्यात डाव्या कानाच्या मागील बाजूस बंदुकीची गोळी आढळून आल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले होते.
घटनेनंतर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. गोळीबारात वापरण्यात आलेल्या पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.
दरम्यान, शुभम सूर्यवंशी हा तिळवणी-माळभाग मार्गावर पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यासाठी फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुभमला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे मिळून आली. या मुद्देमालाची किंमत ५१ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात शुभमने हे पिस्तुल जॅकी माळगे याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी जॅकीलाही अटक केली. दोन्ही संशयितांना पुढील तपासासाठी मुद्देमालासह शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या शुभम सूर्यवंशी व जॅकी माळगे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गोळीबारामागील नेमका उद्देश, पिस्तुल कोठून आणण्यात आले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.