छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय व किसनराव आवळे विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

कोरोची :सलीम माणगावे 

दि.१६ : छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय, कोरोची तसेच किसनराव आवळे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, कोरोची येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे माजी न्यायमूर्ती, जिल्हा सत्र न्यायालय, इचलकरंजी येथील मा. हातरोटे साहेब यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांच्या कवायत संचलनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बसवराज कोरे यांनी केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली. तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला.

          प्रमुख पाहुणे मा. हातरोटे साहेब यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त व संस्कारांची जोपासना करावी, असे आवाहन केले. भारतीय संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये जपणे आवश्यक आहे. राज्यघटनेने नागरिकांना दिलेली कर्तव्ये, जबाबदाऱ्या व अधिकार याबाबत प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. सशक्त व बलशाली भारताच्या समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेस्त्री मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सातवेकर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधी महाविद्यालय तसेच किसनराव आवळे प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.