इचलकरंजी –विजय मकोटे
दि.२०: येथील पंचगंगा नदीमधील चंदूर ते इचलकरंजी या १० किलोमीटर लांबीच्या नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नदीपात्रातील गाळाचा प्रश्न मार्गी लागणार असून, पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती कमी करण्यास तसेच नदीपात्राची वहनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
चंदूर ते इचलकरंजी या दरम्यान एकूण १० किलोमीटर लांबीच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहावर परिणाम होत असून, पावसाळ्यात नदीपात्राची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात मागील आठवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात बैठक झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून पंचगंगा नदीतील गाळ काढण्याच्या कामास मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना अखेर यश आले असून, शासनाने या कामास हिरवा कंदील दाखविला आहे.
गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पंचगंगा नदीपात्राची खोली व पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे चंदूर, इचलकरंजी परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून, पूरपरिस्थितीच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे, असेही आमदार आवाडे यांनी सांगितले. जलसंपदा विभागाचे अवर सचिव सु. म. जगताप यांनी आदेश जारी केला आहे.
शासनाच्या या निर्णयाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्याचे स्वागत करण्यात येत आहे.