इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.१३: बेकायदा बिगरपरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले. या कारवाईत ४ लाख रुपयांची टाटा इंड्रा चारचाकी आणि ६० हजार रुपये किमतीचे देशी दारूचे १५ बॉक्स, असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि. १३) सकाळी वरण बाजार ते जुना चंदूर रोडवरील दुर्गामाता मंदिराजवळ करण्यात आली.याप्रकरणी हुसेन गणी शेख (वय ३०, रा. दत्तमंदिर रोडजवळ, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७८२/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजता वरण बाजार, इचलकरंजी ते जुना चंदूर रोडवरील दुर्गामाता मंदिराजवळ संशयास्पदरीत्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई केली.
या कारवाईत जी.एम. डॉक्टर नावाचे लेबल असलेल्या देशी दारूचे १२ कागदी बॉक्स जप्त करण्यात आले. प्रत्येक बॉक्समध्ये ९० मिली क्षमतेच्या १०० प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या होत्या. त्यांची एकूण किंमत ४८ हजार रुपये आहे. तसेच टँगो पंच नावाचे लेबल असलेले देशी दारूचे तीन बॉक्स मिळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ९० मिलीच्या १०० सिलबंद बाटल्या असून त्यांची किंमत १२ हजार रुपये आहे.
याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा इंड्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची चारचाकी (क्रमांक एमएच ०९ सी ०८०६) अंदाजे चार लाख रुपये किमतीची असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशाप्रकारे दारूसह वाहन असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीकडे दारू वाहतुकीसाठी आवश्यक असलेली पावती किंवा टीपी नसताना तो बेकायदा व बिगरपरवाना दारूची वाहतूक करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश पोपट सन्नदी यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक साने, सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण, पो.हे.कॉ. सूर्यवंशी, पो.अं. गणेश सन्नदी, सदाम सन्नदी, शिरीष कांबळे, विकास चांगुले, राहुल कामत, तुषार सूर्यवंशी व प्रमोद चव्हाण यांनी केली.या गुन्ह्याचा पुढील तपास तपासी अंमलदार विकास चव्हाणे करीत आहेत.