पारंपारिक कोष्टी समाजाला न्याय मिळवून देऊ

वस्त्रोद्योग राजयमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची ग्वाही

इचलकरंजी: विजय मकोटे

दि:७ डिसेंबर मराठवाडा व विदर्भाप्रमाणे महाराष्ट्रात कोष्टी समाजातील विणकरांना वीजदर सवलत मिळावी, पारंपारिक कोष्टी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, वस्त्रोद्योग धोरणामध्ये मुळ पारंपारिक विणकर समाजास वेगळी अतिरिक्त सवलत मिळावी, पॅकेज स्कीम ऑफ इसेन्टीव्हमध्ये पारंपारिक विणकरांना वस्त्रोद्योग सुरू करण्यासाठी दहा टक्के अतिरिक्त लाभ मिळावा यासह केंद्र स्तरावरील विविध मागण्यांचे निवदेन इचलकरंजी महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई या राज्यव्यापी विणकर्‍यांच्या संघटनेच्यावतीने राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना समाजाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.
दरम्यान, निवेदनाचा स्विकार करुन नामदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी, या प्रश्‍नी संबंधित अधिकारी व खात्याचे मंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेवू. पारंपारिक कोष्टी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्‍वासन शिष्टमंडळास दिले.
निवेदनात, राज्यामध्ये 18 पगड जातीमध्ये विणकर कोष्टी या जातीचे लोक पिढ्यान् पिढया अनेक वर्षापासून पारंपारिक कापड निर्मितीचा व्यवसाय करीत आहेत. पूर्वीच्या हातमागापासून सध्या आधुनिक शटललेस लूमपर्यंत प्रगती झाली आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे सहकार्य लाभले आहेच. राज्यातील 12 बलुतेदारांपैकी काही जातींना यापूर्वी सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्रात जो कोष्टी जातीचा विणकर आहे तो या बदलत्या परिस्थितीमध्ये मागे पडला असून त्यास आज शासन मदतीची गरज आहे. हा व्यवसाय व त्यामध्ये काम करणारे विणकर यांना उर्जितावस्था आणणेसाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात मराठवाडा व विदर्भाप्रमाणे कोष्टी समाजातील विणकरांना वीजदर सवलत द्यावी, पारंपारिक कोष्टी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, त्याद्वारे व्यवसायासाठी वैयक्तिक 20 लाख व भागिदारीसाठी 50 लाख रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा किंवा व्याज राज्य शासनाने भरावे, वस्त्रोद्योग धोरणामध्ये मुळ पारंपारिक विणकर समाजास वेगळी अतिरिक्त सवलत मिळावी, पॅकेज स्कीम ऑफ इसेन्टीव्हमध्ये पारंपारिक विणकरांना वस्त्रोद्योग सुरू करण्यासाठी 10 टक्के अतिरिक्त लाभ मिळावा आदी मागण्या नमुद करण्यात आल्या आहेत.
या सर्व मागण्यांबाबत संबंधित मंत्री व अधिकारी यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेवू असे आश्‍वासन नामदार पाटील यांनी दिले. शिष्टमंडळात महासचिव रामचंद्र निमणकर, सचिव मिलींद कांबळे, पीडीएक्सएलचे संचालक गजानन होगाडे, सदस्य शिरीष कांबळे, शितल सातपुते, जनता बँक संचालक महेश सातपुते, पत्रकार दयानंद लिपारे, अरूण वडेकर यांचेसह विटा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष किरणराव तारळेकर, वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी, इचलकरंजी देवांग समाजाचे अध्यक्ष विश्‍वनाथ मुसळे यांचा समावेश होता.