सांगली: अय्यान पटेल

दि.१८: गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम दि. 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, सांगली यांच्या वतीने सांगली येथील श्रीलक्ष्मीनारायण गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने शासकीय योजनांबाबत लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

            गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक व भाविक एकत्र येत असल्याने त्यांच्यापर्यंत शासकीय योजना व लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी व प्रतिनिधींनी नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

            जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष माने यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन केले. युवक-युवतींनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

            जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत कार्यरत जिल्हा चाईल्ड लाईन, सांगलीच्या आरती निडसोसे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये चाईल्ड हेल्पलाईन 1098, महिला हेल्पलाईन 181, बालसंगोपन योजना, अनाथ प्रमाणपत्र, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या विविध यंत्रणा, हेल्पलाईन क्रमांक आणि शासकीय योजनांचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

            लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती केवळ ऐकविण्याबरोबरच संबंधित योजनांसाठी पात्रता, उपलब्ध सुविधा आणि लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्रत्यक्ष संवादातून उत्तरे मिळण्यास मदत झाली.या कार्यक्रमास श्रीलक्ष्मीनारायण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोहर सारडा, मंडळाचे पदाधिकारी, मॉडेल करिअर सेंटरचे यंग प्रोफेशनल प्रविण बनकर तसेच मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते.

            गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि शासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करणे, हा ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.