सातारा: प्रतिनिधी
दि. १९ – आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लिंगायत बांधवांनी धर्माच्या रकान्यात आपली धार्मिक ओळख ‘लिंगायत धर्म’ अशी नोंदवून घ्यावी आणि जात व धर्म या दोन्हींची स्वतंत्र माहिती द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की देशातील लिंगायत समाजाची संख्या मोठी असल्याचे विविध स्तरांवर सांगितले जाते. मात्र २०११ च्या जनगणनेतील उपलब्ध ‘लिंगायत / वीरशैव’ या संयुक्त नोंदीनुसार२६लाख ६३ हजार २२९ व्यक्तींची नोंद झाली होती. ही संख्या त्या वेळच्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ०.२२ टक्के होती. मात्र हा २०११ मधील आकडा असून तो सध्याची लिंगायत लोकसंख्या मानता येत नाही. तसेच ही नोंद ‘लिंगायत / वीरशैव’ या संयुक्त स्वरूपात असल्याने स्वतंत्र लिंगायत लोकसंख्येचा आकडा म्हणूनही त्याचा अर्थ लावता येत नाही.
२०११ च्या जनगणनेनुसार देशातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी हे सहा राष्ट्रीय स्तरावर अधिसूचित अल्पसंख्याक समुदाय आहेत. त्यापैकी जैन समाजाची लोकसंख्या सुमारे ४४.५२ लाख, तर पारशी समाजाची सुमारे ५७ हजार होती. या तुलनेत ‘लिंगायत /वीरशैव’ नोंद सुमारे २६.६३ लाख होती. लिंगायत समाजाची लोकसंख्या व समाजातील मागासलेपण याचा विचार करून लिंगायत धर्मास केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अल्पसंख्याक दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे. लिंगायत समाजातील विविध जाती-जमातींनी आपली जातीय ओळख कायम ठेवतानाच धर्माच्या रकान्यात आपली धार्मिक ओळख स्पष्टपणे नोंदवावी. जात आणि धर्म या स्वतंत्र सामाजिक ओळखी असून जनगणनेत दोन्हींची अचूक नोंद होणे आवश्यक आहे. अचूक लोकसंख्यात्मक माहिती उपलब्ध झाल्यास समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक स्थितीचा भविष्यात अधिक वस्तुनिष्ठ अभ्यास करता येईल असे त्यांनी म्हटले आहे.
ही मागणी कोणत्याही अन्य समाजाच्या विरोधात नसून लिंगायत समाजाची सांख्यिकीय ओळख स्पष्ट करण्याच्या दृष्टीने ती आवश्यक आहे, असे डॉ. चेणगे यांनी स्पष्ट केले.