विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून सुयोग्य पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा : डॉ. बसवेश्वर चेणगे

श्री शिवाजी विद्यालय मसूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सातारा  : प्रतिनिधी 

दि.२४ :  विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून शालेय अभ्यासक्रमात सुयोग्य पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा मात्र त्याच्या आहारी जाऊ नये असे उदगार गुंफण स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन चे चेअरमन डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी काढले. ते मसूर, जिल्हा सातारा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका प्रतिभा ताम्हणकर उपस्थित होत्या. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व दाते यांच्या वतीने इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रतिभा ताम्हणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “विद्यार्थी दशेपासूनच आपण शिक्षक, पालक, कुटुंब आणि समाज यांचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून अभ्यास केला पाहिजे. जीवनात चांगले नाव कमवावे आणि ज्यांच्यामुळे आपण घडलो, त्यांना कधीही विसरता कामा नये,” असा संदेश दिला.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी बोलताना माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनीही शाळेच्या या उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व देणगीदारांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी पवार यांनी करून सत्कार समारंभामागील हेतू स्पष्ट केला. यावेळी ज्योतिषाचार्य विश्वास भोज, प्रा. सौ. प्राजक्ता साळुंखे, रामचंद्र माने, मोहन कुंभार, आशय शहा,आयुष शहा अर्जुन फाळके, महेश देसाई, बाबासो यादव आदी मान्यवर उपस्थित होते.