‘नशामुक्त भारत’साठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

बापूजी साळुंखे हायस्कूल व रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि. २६ : व्यसनमुक्तीचा संदेश देत ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृती रॅली व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या एनसीसी कॅडेट्ससह विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण व्हावे तसेच समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा बसावा, या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले. एनसीसी ऑफिसर सौ. एस. जे. जावीर यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅडेट्सनी नशामुक्तीवर आधारित प्रभावी नाटिकेचे सादरीकरण करून उपस्थितांचे प्रबोधन केले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष रोटेरियन पंकज कोठारी यांनी तरुण पिढी ही देशाचे भविष्य असून व्यसनाधीनतेमुळे वैयक्तिक व सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन कुटुंबे उद्ध्वस्त होतात. त्यामुळे नशामुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच या उपक्रमाचे कौतुक केले.

रॅलीचा शुभारंभ शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद नेमाने आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेविका तथा विद्यालयाच्या प्राचार्या श्रुती जोशी यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी, माजी अध्यक्ष रोटेरियन संजय घायतिडक, सचिव सुनील यळरुटे, खजिनदार शिवदास कित्तुरे, रोटेरियन प्रकाश रावळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या संपूर्ण उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. पी. ढेरे, पर्यवेक्षक वसंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे यांचीही प्रेरणा मिळाली. कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.