नरंदे: सलीम मुल्ला
दि. २४ : आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने यशस्वी करण्यासाठी नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखाना सज्ज झाला असून, यंदा आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊस तोडणी व वाहतूक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्यातील तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आली असून, उत्कृष्ट पद्धतीने गळीत हंगाम पूर्ण करण्यासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी युवा नेते तथा संचालक आदित्य पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, प्रचिता कोळी, पंचायत समिती सदस्या सीमा म्हैशाळे, दीप्ती जाधव, प्रविण देसाई, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी कर्मचारी संभाजी लोंढे, शुभांगी लोंढे, संचालक विद्यासागर मरजे व शिवगोंडा पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. संचालक सुभाषसिंग राजपूत यांनी स्वागत केले. पोपट भोके यांनी आभार मानले. यावेळी कार्यकारी संचालक मोतीलाल पट्टणकुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.