विद्यार्थिनींसाठी एचआयव्ही-एड्स जनजागृती कार्यक्रम

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि.२८: जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या (DISHA Unit), सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली Intensified I.E.C. Campaign अंतर्गत शालेय विद्यार्थिनींसाठी संवेदनशीलकरण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन २६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी योग्य माहिती, प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे तसेच एचआयव्हीबाबत असलेले गैरसमज दूर करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमात समुपदेशक राधिका कांबळे व एनजीओचे रणजीत गायकवाड यांनी विद्यार्थिनींना एचआयव्ही/एड्सचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्याची काळजी तसेच एचआयव्हीबाधित व्यक्तींशी भेदभाव न करता संवेदनशीलतेने वागण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या विविध शंकांचे निरसन करून आरोग्यविषयक आवश्यक माहिती देण्यात आली. तसेच ए.आर.टी. केंद्र, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी येथे उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा व समुपदेशन सुविधांचीही माहिती देण्यात आली.या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन, आरोग्यजागरूकता आणि सामाजिक संवेदनशीलता वाढण्यास मदत झाली. कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.