धरणगुत्ती :राम आवळे
दि.२९ : डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचलित अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती, ता. शिरोळ येथे शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात फार्मसीचे जनक प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या प्रतिमेचे पूजन करून फार्मसी ओथचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांनी फार्मासिस्टची सामाजिक बांधिलकी तसेच आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून ऑनलाइन नॅशनल लेव्हल हर्बेरियम शीट प्रिपरेशन कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले. देशातील फार्मसी, बीएएमएस तसेच बीएचएमएस विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांतील तब्बल १,१६१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एपीटीआय महाराष्ट्र स्टेट ब्रँच आणि नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, इंडिया यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत समाजामध्ये औषधांच्या योग्य वापराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने दानोळी, कोथळी, उमळवाड आणि जयसिंगपूर बसस्थानक येथे पेशंट कौन्सलिंग कॅम्प तसेच जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सचिन निटवे व उपस्थित फार्मासिस्ट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दानोळी, कोथळी व उमळवाड येथील फार्मासिस्ट तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित फार्मासिस्ट व ॲलुमनी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध संदेशफलकांच्या माध्यमातून नागरिकांना औषधांचा योग्य व सुरक्षित वापर, योग्य वेळी व योग्य मात्रेत औषधे घेणे तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या कालावधीपर्यंत औषधे नियमित घेण्याचे महत्त्व पटवून दिले. औषधांबाबतचे गैरसमज दूर करून नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला.या उपक्रमासाठी एनपीडब्ल्यूएचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल, उपाध्यक्ष डॉ. अमोल शहा, एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट प्रा. प्रवीण जावळे तसेच एनपीडब्ल्यूए कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीचे डॉ. सचिन निटवे, डॉ. निलेश चौगुले, डॉ. अन्सार पटेल, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. दुर्गाचरण भागवत, डॉ. अभिजीत कुलकर्णी व डॉ. शोभराज माळवी यांचे सहकार्य लाभले.
ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय जे. मगदूम, उपाध्यक्षा तथा सेक्रेटरी अँड. डॉ. सोनाली वि. मगदूम आणि कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांनी फार्मासिस्ट डे निमित्त सर्व फार्मासिस्टना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका कु. सायली पाटील व अध्यापिका मानसी झाडे यांनी केले. कार्यक्रमाचा लाभ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी घेतला.