निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात इचलकरंजीत महाविकास आघाडीची निदर्शने

ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्याची मागणी; मतदार यादीतील फेरबदलाची स्वतंत्र चौकशी करण्याचा आग्रह

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि.२९ : मतदार यादीतून पात्र मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात इचलकरंजी शहर महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

           निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी कारभारामुळे अनेक पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पात्र मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळणे ही लोकशाही आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांवर आघात करणारी बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अन्य निवडणूक आयुक्तांना विश्वासात न घेता आयोगाचा कारभार आपल्या मर्जीप्रमाणे चालविल्याचा आरोप करण्यात आला.

         यावेळी महाविकास आघाडीचे निमंत्रक शशांक बावचकर यांनी ज्ञानेश कुमार यांना पदावरून तातडीने दूर करण्याची तसेच त्यांच्या कार्यकाळात मतदार यादीमध्ये झालेल्या फेरबदलाची स्वतंत्रपणे समीक्षा करण्याची मागणी केली. तसेच या मागण्यांसाठी आगामी काळातही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

               निदर्शनांमध्ये सागर चाळके, मदनराव कारंडे, शिवसेनाप्रमुख संजय चौगुले, मलकारी लवटे, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, प्रकाश मोरबळे, कॉ. सदा मलाबादे, वसंत कोरवी, नितीन कोकणे, सचिन राणे, अमरजीत जाधव, अजित मिणेकर, अभिजीत रवंदे, सयाजी चव्हाण, बाबासाहेब कोतवाल, नागेश शेजाळे, संतोष पाटील, तोसिफ लाटकर, हेमंत वनकुंद्रे, नगरसेविका स्वाती लोखंडे, बिस्मिल्ला गैबान यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.