जैनापूर:राम आवळे
दि २९ : सध्याच्या शेती क्षेत्रातील विविध संकटांवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाची आधुनिक शेतीशी सांगड घालणे तसेच सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. हवामान, माती आणि जैविक परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना अचूक सल्ला देण्याची क्षमता एआय तंत्रज्ञानामध्ये असून, ते शेतीसाठी प्रभावी मार्गदर्शक ठरत आहे. उत्पादन खर्च कमी करून उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन शरद संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी केले.
जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयात सहकारमहर्षी श्री. शामराव पाटील यड्रावकर (आण्णा) यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त खत उत्पादनांचे उद्घाटन व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. यड्रावकर म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचा सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो. शेतकऱ्यांनी उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच उत्पादनात वाढ करण्यावर भर द्यावा. शरद कृषी महाविद्यालय आणि शरद सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना विविध जैविक व रासायनिक विद्राव्य खते अल्प दरात, ना नफा-ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या खत उत्पादनासाठी कृषी विज्ञान केंद्राचे संत अंकुश पाटील यांचे सहकार्य लाभले. शरद साखर कारखान्याचे संचालक, मुख्य कृषी अधिकारी, ऊस विकास अधिकारी आणि प्रगतिशील शेतकरी यांच्या हस्ते खत उत्पादनांचे उद्घाटन व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत पाटील यांनी महाविद्यालयाने तयार केलेल्या विविध खतांची वैशिष्ट्ये, त्यांचा वापर आणि शेतीतील उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आभार प्रा. पूजा भोसले यांनी मानले.