इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१: कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्यावतीने सहकारी बँकांच्या गटवार पद्धतीतील एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेस ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या समारंभात असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे व उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ग्राहकांना केंद्रबिंदू मानून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या धर्तीवर आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँक सातत्याने कार्यरत आहे. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा विनासायास पूर्ण व्हाव्यात तसेच अद्याप विविध बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांच्या दूरदृष्टीला अनुसरून आणि प्रकाशआण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वस्त्रनगरी इचलकरंजीच्या व्यवसायाला नवी दिशा व चालना देण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. व्यावसायिकांच्या गरजा लक्षात घेऊन शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ थेट व्यावसायिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँक कार्यरत आहे. महिलांनीही स्वावलंबी होऊन उद्योजक म्हणून पुढे यावे, यासाठी विविध आर्थिक सुविधांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
वस्त्रोद्योगाबरोबरच इंजिनिअरिंग, गारमेंट्स, सूक्ष्म व लघुउद्योगांना चालना देण्याबरोबरच सर्व समाजघटकांतील युवा उद्योजकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँक सातत्याने प्रयत्न करत असल्याचे आवाडे यांनी सांगितले.बँकेचा विस्तार महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांपलीकडे गुजरात व गोवा राज्यांत करण्यासाठी बँक सज्ज झाली असून, सध्या महाराष्ट्र व कर्नाटकात ५५ शाखांच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसायाचा टप्पा बँकेने पार केला आहे. ग्राहकांचा बँकेवरील विश्वास आणि सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक, संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनकडून मिळालेला पुरस्कार हा बँकेच्या कार्याची पावती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन सीए संजयकुमार अनिगोळ, व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, संचालक सुभाष जाधव, महेश सातपुते, बाबूराव पाटील, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य सचिन देवरुखकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे तसेच अन्य सहकारी बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.