इचलकरंजी ::विजय मकोटे
दि.७: रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी अँन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित जिल्हास्तरीय झिम्मा-फुगडी स्पर्धा दाते मळा येथील रोटरी श्रीमती सोनीदेवी रा. बाहेती सेवा केंद्रात उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन सौ. मौश्मी राहुलजी आवाडे यांच्या हस्ते झाले.महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच पारंपरिक खेळ व महाराष्ट्रीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने रोटरीतर्फे दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाच्या स्पर्धेलाही कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषा, झिम्मा-फुगडी, लोकनृत्य आणि लोकपरंपरांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले.
स्पर्धेचे परीक्षण झिम्मा-फुगडी या पारंपरिक खेळाची जाण असलेल्या अनुभवी परीक्षक सुजाता गोडसे व दीपाली फडके यांनी केले. त्यांनी पारदर्शक पद्धतीने परीक्षण करून निकाल जाहीर केला. सोनचाफा ग्रुप (इचलकरंजी) याने प्रथम, नागनाथ ग्रुप (सोनाळी) याने द्वितीय, तर ऐशप्रिया अकॅडमी (चिपळूण) याने तृतीय क्रमांक पटकावला. फ्रेंडशिप कॉर्नर (इचलकरंजी) यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. विजेत्यांना रोख पारितोषिक व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी सौ. मौश्मी आवाडे यांनी स्पर्धेत सहभागी महिलांचे कौतुक केले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी झिम्मा-फुगडीसारख्या पारंपरिक स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी रोटरी क्लब व रोटरी अँन्सचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. असिस्टंट गव्हर्नर सौ. यास्मिन मनेर यांनीही उपस्थित राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी देणगी दिल्याबद्दल सौ. मौश्मी आवाडे, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स, तारा हॉटेल (कबाडे), आरोही फिटनेस व गुरुमाऊली यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोटरी अँन्सच्या अध्यक्षा सौ. वैशाली कोठारी यांनी स्वागत केले. प्रोजेक्ट चेअरमन सौ. मीनाक्षी तंगडी यांनी प्रास्ताविक केले. सौ. मौश्मी आवाडे यांची ओळख सौ. मनाली मुनोत यांनी, तर परीक्षकांची ओळख सौ. शर्मिला पाटील यांनी करून दिली. आभार सौ. स्वाती सातपुते यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. शुभांगी माळी यांनी केले. कार्यक्रमास रोटरी अँन्सचे सदस्य व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.