रोटरी गणराया अवार्डने गणेशोत्सव मंडळांचा गौरव

इचलकरंजी :अन्वर मुल्ला 

दि.७: रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व इचलकरंजी पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इचलकरंजी शहर मर्यादित श्री गणेशोत्सव डेकोरेशन व आरास स्पर्धेचा ‘रोटरी गणराया अवार्ड’ पारितोषिक वितरण समारंभ दाते मळा येथील रोटरी श्रीमती सोनीदेवी रामबिलास बाहेती सेवा केंद्रात उत्साहात पार पडला. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेश भक्तांना विविध विभागांत प्रोत्साहनपर पारितोषिकांनी गौरविण्यात आले.स्पर्धेत उत्कृष्ट मूर्ती, समाजप्रबोधन देखावा, उत्कृष्ट हलता देखावा, कलात्मक, पौराणिक व ऐतिहासिक देखावा तसेच उत्कृष्ट सजावट अशा विविध विभागांचा समावेश होता. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक संदेश देणारे देखावे सादर केले.

    प्रमुख पाहुणे डीवायएसपी विक्रांत गायकवाड यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना व घरगुती गणेश भक्तांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी गायकवाड म्हणाले, सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणेश भक्तांनी समाजाभिमुख डेकोरेशनच्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश दिला आहे. रोटरी क्लब गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून गणेश मंडळांना प्रोत्साहन देत आहे. यंदा पोलीस दलालाही या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली असून, ही परंपरा कायमस्वरूपी सुरू ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

     कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी स्वागत केले. प्रोजेक्ट चेअरमन प्रकाश रावळ यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे परीक्षण करणारे संजय घायतिडक, शिवदास कित्तुरे, महादेव खारगे, सुभाष तंगडी, सागर पाटील, शीतल चौगुले, प्रमोद धुत्रे, सुनील सातपुते व सुहास शिंदे यांचा डीवायएसपी गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुभाष तंगडी व सागर पाटील यांनी केले. आभार रोटरी सेक्रेटरी सुनील येळरूटे यांनी मानले.

व्यासपीठावर रोटरीचे माजी अध्यक्ष वसंत पाटील, नेमिनाथ कोथळे व संजय घायतिडक उपस्थित होते. कार्यक्रमास अजित कुरडे, श्रीनिवास दबडे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        सार्वजनिक गणेशोत्सव देखावा विभाग :
उत्कृष्ट मूर्ती विभागात नदीवेस जनसेवा गणेशोत्सव मंडळ, जामदार गल्ली प्रथम, जय शिवराय गणेशोत्सव मंडळ, विक्रमनगर द्वितीय, तर फेटा ग्रुप गणेशोत्सव मंडळ, लिंबू चौक तृतीय ठरले. श्रीराम प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ, इंडस्ट्रियल इस्टेटला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

      समाजप्रबोधन देखाव्यात श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळ, शेळके गल्ली प्रथम, न्यू गणेश तरुण मंडळ, सम्राट अशोकनगर द्वितीय, यशवंत गणेशोत्सव मंडळ, खंजिरे मळा तृतीय ठरले. विश्वज्योत तरुण मंडळ, विठ्ठलनगर, शहापूर व सुखकर्ता गणेशोत्सव मंडळ, विकासनगर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

उत्कृष्ट हलता देखाव्यात सरस्वती मार्केट गणेशोत्सव मंडळ प्रथम, लक्ष्मी को-ऑप. प्रोसेस द्वितीय, नागज्योती युवक मंडळ, गावभाग तृतीय, तर वखारभाग गणेशोत्सव मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ऐतिहासिक देखाव्यासाठी मोरया ग्रुप, पीएनजीजवळ प्रथम ठरला. पौराणिक देखाव्यात खंजिरेनगर गणेशोत्सव मंडळ प्रथम, नारायण पेठ गणेशोत्सव मंडळ, नवनाळे गल्ली द्वितीय, श्री शिवशक्ती गल्ली गणेशोत्सव मंडळ, षटकोन चौक तृतीय, तर सॉफ्ट कॉर्नर गणेशोत्सव मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

       घरगुती गणेशोत्सव आरास विभाग :
समाजप्रबोधन देखाव्यात रमेश पाटील प्रथम, किरण राजेंद्र काकडे द्वितीय, कुमार अर्चित अभिजीत जोशी तृतीय, तर श्री गजानन अर्जुना लाटवडे व रुद्रा राहुल पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट हलता देखाव्यात रोहन संभाजी मोरबाळे प्रथम, चंद्रशेखर शिवानंद गुरव द्वितीय, युवराज गजानन सातपुते तृतीय, तर श्री दत्तराज गजानन इंदुलकर व राजन नायकू कुंभार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

उत्कृष्ट ऐतिहासिक देखाव्यात आदित्य दीपक वाघरे प्रथम व दयानंद दादू आजगेकर द्वितीय ठरले. पौराणिक देखाव्यात अनिल श्रीधर हरणे प्रथम, सचिन रमेश कांबळे द्वितीय, सुशांत फातले तृतीय, तर विवेक कुंभार व दिगंबर वसंत रानभरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

विशेष पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट सांस्कृतिक देखाव्यासाठी सौ. क्षीया सौरभ शहापुरे, मूकबधिर कुटुंबासाठी संदीप जाधव, उत्कृष्ट मूर्तीसाठी सौ. सीमा राजू पुजारी, शालेय विभागासाठी रामभाऊ जगताप हायस्कूल, पोलीस विभागासाठी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, तर क्रीडा विभागातील फुटबॉल मॅचसाठी संदीप पाटील यांचा गौरव करण्यात आला. ‘रोटरी गणेश भक्त’ पारितोषिक सौ. अनुराधा प्रमोद धुत्रे, वसंत सपकाळे व मदनमोहन राठी यांना प्रदान करण्यात आले.