स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

सावर्डेतील घरफोडीचा गुन्हा उघड; पालघरचे चार आरोपी ताब्यात ४ लाख २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; मोबाइल टॉवरच्या तीन बॅटऱ्यांसह गुन्ह्यातील वाहन जप्त

रत्नागिरी : दिपक तुळसणकर 

दि.२०: सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी पालघर जिल्ह्यातील चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मोबाइल टॉवरच्या तीन बॅटऱ्या, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि अन्य साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१ (४) व ३०५ (अ) नुसार घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित वाहन आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तपास करीत होते.
दरम्यान, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी ते चिपळूण विभागात शासकीय वाहनातून गस्त घालत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी फाट्याच्या पुढे ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंटसमोर संशयित वाहन उभे असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चार इसम आढळून आले.
त्यांची नावे जयप्रकाश एकनाथ चिंदरकर (वय ३२, विरार पूर्व), नवनाथ भगवान उतेकर (वय ३६, विरार पूर्व), कौशिक प्रभाकर जाधव (वय २७, विरार) आणि मंगेश मनोज गुरव (वय २०, नालासोपारा), अशी आहेत. हे सर्व आरोपी पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयितांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मोबाइल टॉवरच्या तीन बॅटऱ्या, ज्यांची किंमत २२ हजार ५०० रुपये आहे, तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व अन्य साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यात घेतलेले चारही आरोपी आणि हस्तगत मुद्देमाल पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी सावर्डे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विजय आंबेकर, वैभव मोरे, गणेश सावंत आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.