कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.२७ : पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा प्रश्न आणि सोलापूरसह मराठवाड्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय म्हणून प्रस्तावित कृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारने सहकार्य करावे, तसेच आवश्यक मंजुरीची प्रक्रिया जलद करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना फटका बसतो. दुसरीकडे सोलापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागांना पाण्याची टंचाई भेडसावते. या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीचे सुमारे ५० टीएमसी अतिरिक्त पूरपाणी १३५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून भीमा खोऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे.
या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १३ हजार ६२२ कोटी रुपये असून, सुमारे १.२५ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे. तसेच गुरुत्वाकर्षणाच्या आधारे मराठवाड्याला २३.६६ टीएमसी पाणी देण्याचाही प्रस्ताव आहे. प्रकल्पाचा प्राथमिक व्यवहार्यता अहवाल २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सादर करण्यात आला असून, सध्या सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका कमी करण्यास मदत होण्याबरोबरच सोलापूर आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी वैयक्तिक लक्ष घालून आवश्यक सहकार्य आणि आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती खासदार महाडिक यांनी केली आहे.