महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी कथित अवमानकारक लिखाण; लेखक व प्रकाशकांवर कारवाईची मागणी

बसव मंटप’ पुस्तकावर बंदी घालण्याची विश्वगुरू बसवेश्वर लिंगायत समाज सेवा प्रतिष्ठानची मागणी; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

इचलकरंजी :सचिन तिगडी 

दि.२७ : कर्नाटक राज्यातील लेखक रवि हंजी आणि ‘बसव मंटप’ या पुस्तकाचे प्रकाशक विश्वेश्वर भट यांनी महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी कथित अवमानकारक व आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ विश्वगुरू बसवेश्वर लिंगायत समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने इचलकरंजी येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संबंधित पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुराची सखोल चौकशी करून लेखक व प्रकाशकांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


कर्नाटकातील दावणगिरी येथील लेखक रवि हंजी यांनी लिहिलेल्या आणि विश्वेश्वर भट यांनी प्रकाशित केलेल्या ‘बसव मंटप’ या पुस्तकामध्ये बाराव्या शतकातील महान समाजसुधारक विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण असल्याचे प्रतिष्ठानने निवेदनात म्हटले आहे. या लिखाणामुळे लिंगायत समाजासह महात्मा बसवेश्वरांचे अनुयायी, बसवप्रेमी आणि पुरोगामी विचारांच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकातच जातिभेद, वर्णभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवून समता, बंधुता, मानवता व सामाजिक न्यायाचा विचार मांडला. ‘कायक वे कैलास’ अर्थात कर्म हीच पूजा, हा सिद्धांत देत त्यांनी श्रमप्रतिष्ठेचा संदेश संपूर्ण समाजाला दिला. त्यामुळे महात्मा बसवेश्वर हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून समस्त मानवजातीचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिष्ठानने स्पष्ट केले.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली महापुरुषांविषयी अवमानकारक लिखाण करून समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारच्या लिखाणामुळे सामाजिक असंतोष निर्माण होऊन सामाजिक सलोखा आणि शांततेला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘बसव मंटप’ पुस्तकातील कथित आक्षेपार्ह मजकुराची निष्पक्ष चौकशी करावी, लेखक रवि हंजी व प्रकाशक विश्वेश्वर भट यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे              कार्यवाही व शिफारस करावी, तसेच पुस्तकावर बंदी घालण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवावी, अशा मागण्या प्रतिष्ठानने केल्या आहेत.
भविष्यात कोणत्याही महापुरुषांविषयी अशा प्रकारचे अवमानकारक लिखाण होऊ नये, यासाठी शासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे टी. एस. कडोलकर यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले.