जत येथील मुस्लिम समाजाच्या इस्तेमास विरोध करणार नाही; हिंदू एकता आंदोलनाचा निर्णय

मदणी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची माजी आमदार नितीन शिंदे यांची भेट; सोशल मीडियावरील व्हिडिओ खोटे असल्याचा दावा

सांगली : मयुरी देशपांडे 

दि.२७: जत येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मुस्लिम समाजाच्या इस्तेमास विरोध करू नये, अशी मागणी मदणी मरकस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हिंदू एकता आंदोलन संघटनेकडे पत्राद्वारे करण्यात आली. यानंतर हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी इस्तेमास विरोध करणार नसल्याचे स्पष्ट केले.हिंदू एकता आंदोलनाच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात जत येथील तबलिगी मुस्लिम समाजाचा इस्तेमा उधळून लावण्याचा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सांगली मदणी मरकस चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी मुजीर जांभळीकर यांनी शिष्टमंडळासह शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन इस्तेमास विरोध करू नये, अशी विनंती केली.

यावेळी शिंदे यांनी सांगितले की, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओंच्या आधारे इस्तेमाबाबत आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्हिडिओ खोटे व बेकायदेशीर असल्याचे सांगून इस्तेम्यात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, असे आश्वासन दिले. त्यामुळे जत येथील इस्तेमास विरोध करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुजीर जांभळीकर यांनी सांगितले की, इस्तेम्याबाबत चुकीचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. इस्तेम्यात कुराण पठण आणि धार्मिक कार्यक्रम होतील. देशात सामाजिक सलोखा, बंधुता, एकात्मता व शांतता टिकावी, यासाठी प्रार्थना केली जाणार आहे. या कार्यक्रमात हिंदू बांधवांनाही सहभागी होता येणार असून, भोजन पूर्णपणे शाकाहारी असेल. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी दिले.दरम्यान, इस्तेम्याच्या आयोजनादरम्यान शांतता व सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी आयोजकांची असून, त्यांनी दिलेल्या आश्वासनांचे पालन करणे अपेक्षित असल्याचे या भेटीत स्पष्ट करण्यात आले.

यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष पै. प्रदीप निकम, राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार, मनोज साळुंखे, प्रकाश निकम, गजानन मोरे, गजानन माने, सुमित शिंगे, अनिकेत अंम्बरूळे, सुजित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.