संगमेश्वर:-
सध्या जिल्ह्यात सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या अशोका गॅस कंपनीकडून गॅसचा नियमित पूरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील रिक्षाव्यवसायिकांवर रिक्षा बंद ठेवाव्या लागत असल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे,त्यामुळे अखेर रिक्षा व्यवसाईकांना आक्रमक पाऊल उचलण्याची वेळ आली असल्याचे कडवई तुरळ चिखली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे .
शासनाने सध्या गॅसवर चालणाऱ्या गाड्यांच्या निर्मितीला विशेष महत्व दिले आहे . मात्र यावर कोणतीही ठोस उपाययोजना न करताच हा निर्णय घेतला गेल्याने याचा त्रास वाहन चालकांना होत असल्याचे समोर येत आहे . याचा जास्त फटका हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षा व्यवसायिकाना मोठया प्रमाणात बसला असल्याचे पहायला मिळत आहे .त्यातल्यात्यात पेट्रोल हा पर्याय न देताच निर्मीती करण्यात आलेल्या रिक्षा व्यवसायिकांवर तर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे .यामुळे जिल्ह्यातील रिक्षा व्यवसाईक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे .
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १६ सिएनजी पंप आहेत . याना डिंगणी येथील अशोका गॅस कंपनीकडून गॅसचा पुरवठा केला जातो .मात्र हा पुरवठा नियमित होत नसल्याने वाहनचालकांची चांगलीच फरफट होत आहे. गर्दीच्या हंगामात प्रत्येक पंपावर दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा गॅससाठी लागल्याचे चित्र दिसून येते .त्यामुळे एका गाडीतून येणारा ८०० ते १२०० किलो गॅस काही वेळातच संपून जात असतो . यामुळे उदरनिर्वाहाचे एकमेव रिक्षा हेच साधन असणाऱ्या रिक्षा व्यवसायिकाना गॅस न मिळाल्याने दोन दोन दिवस गाडी उभी करून ठेवावी लागत असल्याने उपासमारीची वेळ येत आहे .
याबाबत पंपात विचारणा केली असता अशोका कंपनीकडून नियमित गॅस पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येते तर अशोका गॅस कम्पनिकडून गेल इंडीया कम्पनिकडून गॅसचा सुरळीत पुरवठा होत नसल्याचे समजते . त्यामुळे कुणाला जाब विचारणार असा प्रश्न
उभा राहत आहे .
यामुळे रिक्षा व्यवसायिक आक्रमक झाले असून लवकरच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन यावर योग्य तोडगा निघावा अशी मागणी केली जाणार आहे . अन्यथा नाईलाजाने जिल्ह्यातील सर्व रिक्षा व्यवसाईक रस्त्यावर उतरणार असल्याचे रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यानि सांगितले . जर जिल्ह्यातील वाहनचालकांना गॅस मिळणार नसेल तर डिंगणीच्या गॅस स्टेशन वरून परजिल्ह्यात जाणाऱ्या गाड्याबाबत आम्हालाही विचार करावा लागेल असेही त्यांनी सांगितले .