कडवई : नियाझ खान
दि.२५ जुलै २०२६ :संगमेश्वर तालुक्यातील कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अभंगांचा सुरेल नाद, टाळ-मृदंगाची साथ आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कडवई परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.सोहळ्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात पारंपरिक रिंगण सोहळा साजरा केला. हरीनामाचा गजर करत दिंडी बाजारपेठेकडे मार्गस्थ झाली.
दिंडीत विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थी, विठ्ठल-रखुमाई पालखी आणि विविध धार्मिक ग्रंथांनी सजविण्यात आलेला ‘ज्ञानरथ’ हे विशेष आकर्षण ठरले. वृक्षदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला, तर वारकरी वेशातील बालचमूंनी ‘साक्षरतेचा नारा’ देत सामाजिक प्रबोधनही केले. दिंडी मार्गावर अनेक ठिकाणी सुवासिनींनी औक्षण करून दिंडीचे स्वागत केले.बाजारपेठेत पालखी पोहोचताच विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर पुन्हा रिंगण सोहळा सादर केला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी अभंगांच्या तालावर फुगड्यांचा आनंद लुटला. स्थानिक रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
दिंडी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचल्यानंतर पुरोहितवाडी ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना राजगिऱ्याचे वाटप करण्यात आले. तसेच मंदिर व्यवस्थापनाचे सुभाष पुरोहित यांनी विठ्ठल, रखुमाई आणि वीणाधारी विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव केला.यावेळी मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, विलास पुरोहित, प्रसन्न पुरोहित, स्वप्नील पुरोहित यांच्यासह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख निलेश कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना आशिष सरमोकादम, प्रदीप कानाल, सोमनाथ कोष्टी, शुभम शिंदे तसेच सर्व वर्गशिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या दिंडी सोहळ्याने आषाढी एकादशीचा उत्सव अधिक संस्मरणीय ठरला.