पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार

- उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

मुंबई,: प्रतिनिधी

दि. 4 :- पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर लढाईमध्ये बलिदान केलेल्या मराठा सैनिकांना स्मारकस्थळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

            हरियाणा राज्यातील रोड मराठा संघटनेच्या विनंतीवरून पानिपत येथील युद्ध स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे याबाबत येथील स्थानिक शासकीय अधिकारी आणि रोड मराठा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून तेथील समस्या डॉ.गोऱ्हे यांनी जाणून घेतल्या.

            मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा निर्माण व्हाव्यात याकरिता विशेष प्रयत्न करण्याची सूचना यावेळी स्थानिक प्रशासनाला करण्यात आली. या कामासाठी वित्त आयोगाच्या जिल्हा नियोजन अथवा लोकप्रतिनिधींच्या निधीतून विकासकामांचे नियोजन करण्याबाबत माहिती घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पानिपत येथील स्थानिक अधिकारी यांना दिल्या. स्थानिक जिल्हा प्रशासनपुरातत्व विभाग आणि राज्य शासनाकडून याकरिता प्रयत्न होण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.