सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: प्रतिनिधी

दि. 1 : छत्रपती शिवाजी महाराज व लोकराजा शाहू महाराजांच्या जयघोषात सुरु झालेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत घेण्यात आलेल्या सायकल रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विविध खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. शाररिक तंदुरुस्तीवर त्यांचा विशेष भर होता. याच विचारांनी कृतज्ञता पर्व मध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे २०० सायकलस्वार सहभागी झाले. फेटे बांधून सहभागी झालेल्या कोल्हापूर सायकलिंग क्लबच्या सदस्यांचा उत्साह अवर्णनीय होता.

सकाळी 6 वाजता शाहू समाधी स्थळी वंदन करून सुरु झालेली सायकल रॅली दसरा चौक, बिंदू चौक, पार्वती टॉकीज, शाहू मिल, सायबर चौक, केएसबीपी चौक ते कावळा नाका, शाहू जन्मस्थळ या मार्गाने पुन्हा शाहू समाधी स्थळ ठिकाणी समाप्त झाली.

यावेळी कोल्हापूर स्पॉस्ट्स क्लबचे चेतन चव्हाण, रग्गेडियन क्लबचे आकाश कोरगावकर, कोल्हापूर सायकलिंग क्लबचे अनिल शिंदे, उत्तम फराकटे, आदित्य बेडेकर, ऋषिकेश केसकर, उज्वल नागेशकर यांच्यासह सायकलप्रेमी उपस्थित होते.